अगणवाडी कर्मचारी आक्रमक: कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
कोल्हापूर, ता. १५ – (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापुरातही जिल्हा अंगणवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावे, दरमहा पेन्शन देण्यात यावी, 2020 आणि 21 मध्ये कोरोनाच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी व दिवाळी सुट्टी रद्द केल्या होत्या. त्या सुट्ट्या आजही थकीत आहेत. आता त्या सुट्ट्या देणे शक्य नसल्यामुळे प्रशासनाने 25 जानेवारी 2024 रोजी झालेल्या वाटाघाटी मध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सुट्टीच्या काळातील मानधन द्यावे, दहावी पास झालेल्या मदतनिसांना सेविकापदी थेट नियुक्ती द्यावे, एप्रिल 2023 पूर्वी भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना 2002 च्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी, भर पगारी रजा द्यावी अशा मागण्यासाठी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आले. यानंतर निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.या निदर्शनात आप्पा पाटील, जयश्री पाटील, विद्या कांबळे, अर्चना पाटील, ए .सी .आंबी, अनिता माने, कुंदा बडबडे यांच्यासह अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.